मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर प्रशासनाची यंत्रणा सक्रिय; पोलीस, पाटबंधारे विभाग व रेस्क्यू टीमकडून शोधकार्य
झरेकाठी (ता. संगमनेर) : प्रतिनिधी सोमनाथ डोळेसंगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) यांनी चनेगाव येथील वसंत बंधाऱ्यावरून उडी मारल्याची घटना शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या काही ग्रामस्थांना एक व्यक्ती बंधाऱ्यावरून उडी मारताना दिसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी कडेला दुचाकी उभी असल्याचे, तसेच जवळच मोबाईल फोन आढळल्याचे समोर आले. दुचाकी व मोबाईलच्या आधारे संबंधित व्यक्ती सतीश वाणी असल्याची ओळख पटल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वाणी कुटुंबीयांना कळविले. त्यानंतर कुटुंबीयांनी आश्वी, राहुरी आणि लोणी पोलीस ठाण्यांना घटनेची माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी रेस्क्यू टीम, पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासनाला तातडीने शोधमोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

शुक्रवारी रात्री आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी आहेर यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि राहता येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.






