वाघाड धरणातील गाळ काढण्यासह पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे नियोजन
झरेकाठी, दि. २३ (प्रतिनिधी) : धरणांमधील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी जलसंपदा विभागाने धोरणात्मक पावले उचलली आहेत. कोकणात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नाशिक, अहिल्यानगर आणि जायकवाडीच्या दिशेने वळवून गोदावरी खोरे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आणि पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाघाड धरण जलपूजन सोहळा आणि प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी खासदार भास्कर भगरे, दिंडोरीच्या नगराध्यक्षा आशा कराटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, नांदूर मध्यमेश्वरचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, वैभव भागवत, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, उपअभियंता संभाजी पाटील यांच्यासह अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
पाणी वापर संस्थांची भूमिका महत्त्वाची
मंत्री विखे-पाटील म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रगतिशील आणि प्रयोगशील असून फळबागा, आधुनिक कृषितंत्रज्ञान आणि विविध शेती प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीच्या विकासासाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि पाणी वापर संस्थांची प्रभावी भूमिका महत्त्वाची आहे. वाघाड प्रकल्पातील पाणी वापर संस्थेने केलेले काम उल्लेखनीय असून संस्थेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.बंद पडलेल्या पाणी वापर संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. संस्थांचे कामकाज नियमित ठेवणे, पाणीपट्टीची वसुली करणे आणि जमा झालेल्या निधीतून संबंधित क्षेत्रातील कालव्यांची दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर हिशेब ठेवून प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धरणातून सोडण्यात येणारे पाणी, त्याचे वितरण आणि प्रत्यक्ष वापर यावर संबंधित यंत्रणेने लक्ष ठेवावे. पाणी वितरणातील त्रुटी आणि अपव्यय रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्यास उपलब्ध जलसाठ्यातून अधिकाधिक क्षेत्राला सिंचनाचा लाभ देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. उल्हास-गोदावरी प्रकल्पासाठी तीन सर्वेक्षणे पूर्ण झाली असून, या प्रकल्पातून ९१ टक्के पाणी उपलब्धतेबाबत माहिती समोर आली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले. कोकणातील अतिरिक्त पाणी नाशिक, अहिल्यानगर आणि जायकवाडीच्या दिशेने आणण्याला प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गाळ काढून सिंचन क्षमता वाढविणार
राज्यातील अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाणीसाठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे धरणांतील गाळ काढण्याच्या कामाला महत्त्व देणे आवश्यक आहे. वाघाड धरणातील गाळाचे प्रमाण, गाळ काढल्यानंतर वाढू शकणारी पाणीसाठवण क्षमता आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा संबंधित विभागाने अभ्यास करावा. नियमानुसार आवश्यक परवानग्या देण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. धरणांतील गाळ काढणे, कालव्यांची दुरुस्ती करणे आणि पाणीगळती रोखणे या उपायांमुळे उपलब्ध जलसाठ्याचा अधिक प्रभावी वापर करता येईल. परिणामी सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी भागांसाठी चारा डेपो आणि टँकरचे नियोजन
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन आवश्यक उपाययोजना करीत आहे. पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा डेपो सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, तेथे गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलसाठ्याचे संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्थेतील सुधारणा यांच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
वाघाड धरणाच्या विकासासाठी कृती समिती
औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी वाघाड धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना केली. धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात आणि धरणाच्या सर्वांगीण विकासासाठी कृती समिती स्थापन करावी, असे त्यांनी सांगितले. वाघाड धरण परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांच्या सोयीसाठी विश्रामगृह उभारण्याबाबतही नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. धरणातील गाळ काढणे, जलसाठा वाढविणे आणि पर्यटनविकासाशी संबंधित कामांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले. खासदार भास्कर भगरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी प्रास्ताविकातून विविध प्रकल्पांची माहिती दिली.






