साकूर (ता. संगमनेर) : साकूर येथील रहिवासी तथा भाजप ओबीसी मोर्चाचे संगमनेर तालुकाध्यक्ष सुभाष रामदास भुजबळ यांचे रविवारी रात्री पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच साकूरसह संपूर्ण पठार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुभाष भुजबळ यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर शून्यातून आपले आर्थिक विश्व उभे केले होते. एलआयसीमध्ये कार्यरत असताना त्यांनी ग्राहकांशी प्रामाणिकपणाचे नाते जपत अनेकांना मदतीचा हात दिला. विमा क्षेत्रातील कामासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले.

भाजप ओबीसी मोर्चाचे संगमनेर तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ओबीसी समाजातील सक्रिय युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा, धडाडी आणि सर्वांशी जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे त्यांनी विविध क्षेत्रांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक सक्रिय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून, साकूर पठार परिसरात शोककळा पसरली आहे.
आज अंत्यसंस्कार: सुभाष भुजबळ यांच्यावर सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता साकूर येथील धुपेश्वर तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.






