विजयादशमीच्या मुहूर्तावर अशा “रावणरुपी माफिया”चे शब्दरूपी दहन राजकीय पाठबळाच्या गैरवापराला आळा घालण्याची मागणी; जमीन व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन या लेखाच्या माध्यमातून करत आहोत.
गुन्हेगारी विश्लेषण: सहदेव जाधव
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात जमीन व्यवहार, कौटुंबिक वाद आणि वादग्रस्त जमिनींच्या साठेखतांवरून निर्माण होणाऱ्या संघर्षांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी राजकीय पाठबळाच्या आधारे दबाव निर्माण केला जात असल्याचे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वापर करून जमिनींवर कब्जा करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर येणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी प्राश्वभूमी असलेले काही कथित गुंडानी जेल मधून बाहेर येताच असे दुशकृत्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या जमिनी दहशतीच्या नावाने गिळण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही पिडीत कुटुंब मात्र हा अत्याचार गुमानपणे सहन करत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे आज दुसऱ्याच्या घरावर असलेली आग उद्या आपल्या घरावर येणार नाही का? याचा विचार प्रत्येक राहूरीकरांनी करणं गरजेचे आहे. त्यामुळे राहुरीकरांनो सावध रहा सतर्क रहा.. एकजूट व्हा व अशा अपप्रवृत्ती तालुक्याबाहेर हद्दपार करा. कारण कधीकाळी वाळू तस्करी सारखे साधारण गुन्हे करणारा पंटर उद्याचा गुन्हेगारी जगताचा आका बनणार नाही याची दक्षता सर्वसामान्य राहुरीकरांसह, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांनी व विशेषतः माझे सहकारी पत्रकार महोदयांनी देखील घेणं गरजेचे आहे. त्यामुळे मी काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील गुन्हेगारी विश्व निर्माण करण्याचे स्वप्न बघू पाहणाऱ्या मदमस्त माफियाची कुंडलीचा अभ्यास करून त्याच अनुषंगाने हा लेख प्रपंच मांडतोय..!

राहुरी तालुक्यात सध्या वादग्रस्त जमिनीवर ताबा घेण्यासाठी काही गुंड प्रवृत्ती फोफावताना दिसत आहेत. काही राजकीय पक्षांना अनभिज्ञ् ठेवून पक्षांचे पदाधिकारी म्हणून मिरवायचे व याच पक्षांच्या दबावाखाली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दबाव टाकून पाहिजे तसें झुकवायचे हा प्रकार सध्या राहुरीत दिसून येत आहे. राहुरी तालुक्यात सध्या कौटुंबिकवादांचा गैरफायदा घेऊन वादग्रस्त जमिनींचे व्यवहार करणे, साठेखतांच्या आधारे जमिनींवर हक्क सांगणे आणि संबंधितांवर अनधिकृत पणे जमाव पाठवून जीवघेणा हल्ला घडवून आणण्याचे प्रकार समोर आलेत तसेच दहशत माजवून दबाव आणण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांत कोणाचाही राजकीय प्रभाव न पाहता पोलिसांनी आणि संबंधित प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी, व सर्वसामान्य नागरिकांना स्वछंदी व लोकशाही मार्गाने जगण्याची संधी द्यावी. अशी मागणी काही पिडीत कुटुंब करत आहे.
आज दुसऱ्याचा प्रश्न, उद्या तुमचाही असू शकतो!
जमिनीच्या वादातून कोणत्याही कुटुंबावर अन्याय होत असेल, तर त्याकडे केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक वाद म्हणून दुर्लक्ष करता कामा नये. आज दुसऱ्या कुटुंबावर आलेले संकट उद्या इतरांवरही येऊ शकते. त्यामुळे राहुरीकरांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून अन्यायाविरोधात कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने एकत्र येण्याची गरज बनलीय. कौटुंबिक वादातून कुटूंबाविरहित माफिया ती जमीन लाटण्याचा हेतू मनात ठेऊन कुटुंबातील एका सदस्याला हाताशी धरून कवडीमोल भावात जमीन घशात घालतो. यासाठी हा माफिया थेट अनधिकृत जमाव तयार करून त्या पिडीत कुटुंबाच्या घरावर चाल करून जातो, हा जमाव तेथील कुटुंबाला या जमावाच्या मार्फत जीवघेणा हल्ला चढवतो, दाग दागिने, रोख रोकड सह धान्याचे भुईमूग शेंगाचे पोते घेऊन बापाची मालमत्ता असल्यागत घेऊन जातो. शेतकऱ्याच्या गोठ्यातील पाळीव बोकड, खुरुड्यातील कोंबड्या या पीडित कुटुंबाच्या समोरच कापून तेथेच येथेच्छ ताव मारतो ही दहशत राहुरीकरांच्या भावी पिढीसाठी धोकादायक नाही का.? त्यामुळे राहुरीकरहो सावधान! गुंडगिरी, दहशत, बेकायदेशीर जमीन बळकावणे आणि राजकीय प्रभावाचा कथित गैरवापर यांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन मिळता कामा नये. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, तक्रारींची अधिकृत नोंद करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.

खून करून शिक्षा ठोठावलेला गुन्हेगार नेता होऊ बघतोय?
काही वर्षांपूर्वी वाळू तस्करीत कुप्रसिद्ध असलेला तस्कर, वाळू तस्करीच्या व गावपातळीवरील राजकीय वादातून एका व्यक्तीचा खून केलेला सिद्ध झालेला व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या इसमाला राजकीय स्थान मिळणे हेच मुळात गंभीर बाब आहे. राजकीय पक्षांनी अशा लोकांना आपल्या पक्षात घेऊन स्वतः ची प्रतिमा जनमाणसात का डागाळावी हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. राहूरी हा तालुका चळवळीचा तालुका आहे. येथे सुसंस्कृत नेत्यांची व नेतृत्वाची परंपरा आहे. परंतू याच संस्कृतीला काळिमा फासणारे काही गुन्हेगारी प्रवृत्ती नेतृत्वाचे स्वप्न पाहत आहे. राहुरी तालुक्यात कायद्याचे राज्य टिकले पाहिजे. राजकीय निष्ठेपेक्षा नागरिकांची सुरक्षितता, जमिनींचे कायदेशीर हक्क आणि सामाजिक शांतता महत्त्वाची आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्य समोर आणणे आणि अन्यायाविरोधात संविधानिक मार्गाने लढा देणे, हीच काळाची गरज व संविधानिक मार्ग आहे. आता सुज्ञ नागरिकांनी अशा अपप्रवृत्ती वेळीच ओळखून त्यांना आळा घातला पाहिजे अन्यथा राहुरी तालुक्यात परळीचा “वाल्मिक पॅटर्न” बघायला मिळू शकतो.

विजयादशमी च्या मुहूर्तावर राजसत्ता न्यूज आपल्या या वेब पेजच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक, तसेच गुन्हेगारी या विषयावर निर्भीड वृत्तांकन सुरु करत आहे. पिडीत शोषित अन्यायग्रस्त राहूरीकरांनी आमच्याशी आवश्य संपर्क साधावा. न्यायासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत.. निर्भीड, निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज “राजसत्ता न्यूज”!
भाग: 1 क्रमशः






