लोणी प्रतिनिधी: शिक्षकांच्या सन्मानासाठी उभारलेल्या व्यासपीठावर शिक्षकांपेक्षा भाजपमधील अंतर्गत राजकारणाचीच चर्चा रंगली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी या राजकीय बालेकिल्ल्यात ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे.

लोणीतील हा कार्यक्रम शिक्षकांचा गौरव सोहळा होता की आगामी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील राजकीय ताकद अजमावण्याचा डाव? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
दरवर्षी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा सोहळा अहिल्यानगर मध्ये आयोजित केला जातो. जिल्ह्याच्या विविध भागांतून शिक्षक, शिक्षण अधिकारी, पालक आणि नागरिक या कार्यक्रमासाठी एकत्र येतात. मात्र, यंदा हा कार्यक्रम लोणी येथे आयोजित करण्यात आला. त्यामुळे बाकी नेते नाराज झाले आणि थेट कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाचे स्थळच राजकीय चर्चेचा विषय ठरले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राम शिंदे यांचे नाव होते. विखे आणि शिंदे यांच्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही बाब चर्चेत होती. त्यातच अध्यक्षच कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने चर्चेला अधिकच उधाण आले. तसेच प्रमुख उपस्थित म्हणून निमंत्रित केलेल्या अनेक आमदारांची गैरहजेरी यामुळेही कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राम शिंदे यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय? याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा जिल्हा परिषदेचा कार्यक्रम पक्षीय राजकारणापासून अलिप्त असणे अपेक्षित असते. मात्र, यंदा कार्यक्रमाच्या ठिकाणापासून निमंत्रणपत्रिकेपर्यंत आणि उपस्थितीपासून गैरहजेरीपर्यंत प्रत्येक बाबीला राजकीय संदर्भ जोडला जात आहे. कार्यक्रम लोणी येथे घेण्याचा निर्णय नेमका कोणत्या निकषांवर झाला? जिह्याच्या मध्यवर्ती भागात होणाऱ्या कार्यक्रमाऐवजी पालकमंत्र्यांच्या राजकीय केंद्राची निवड का करण्यात आली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.







