अहिल्यानगर प्रतिनिधी: भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीकडे बहुतांशी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कानउघडणी केली. पक्ष चिन्हांमुळे तुम्ही आहात, याची जाणीव ठेवा अन्यथा पक्ष नेतृत्वही तुमची जाणीव ठेवणार नाही अशा शब्दात खडेबोल सुनावण्यात आले. यावेळी अनेक नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने जिल्हा प्रभारी राम सातपुते यांच्या सह प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हाध्यक्ष, केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत असल्याच्या कानपिचक्या देखील देण्यात आल्या.भाजपच्या शहर, दक्षिण व उत्तर अशा तीनही जिल्हा कार्यकारणीची बैठक आज, रविवारी नगर शहरात आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तर समारोप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हा प्रभारी राम सातपुते, शहर प्रभारी तथा प्रदेश सचिव भैरवी वाघ- पलांडे यांच्यासह आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (शहर), नितीन दिनकर (उत्तर) व दिलीप भालसिंग (दक्षिण) उपमहापौर धनंजय जाधव तसेच काही पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीला २५ पैकी अवघे ३ नगरसेवक उपस्थित होते तर ३ मंडलाध्यक्षांसह मंडळाचे सरचिटणीस व इतर प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित होते. याबद्दल बोलताना पक्षाचे जिल्हा प्रभारी राम सातपुते म्हणाले, मी २५० किमी. वरून आलो, परंतु तुम्हाला येथे असून येता येत नाही. पक्ष चिन्हामुळे तुम्ही नगरसेवक आहात हे लक्षात ठेवावे. सभापती राम शिंदे पराभूत होऊनही त्यांना पक्षाने मोठे पद दिले, कारण त्यांच्यातील कार्यकर्ता जागा आहे. म्हणूनच ते बैठकीला सर्वांच्या आधी आले. ही खरे तर जिल्हाध्यक्षांची जबाबदारी आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना जाणीव करून द्यायला हवी. सभेतून आमदार निघून जातात, त्या पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते निघून जातात, हा काय प्रकार आहे? ही जबाबदारी जिल्हाध्यक्षांची आहे. आपल्या वागण्यातून पक्ष वाढायला हवा परंतु येथे चुकीचे घडत आहे. अशी प्रत्यक्ष नाराजी प्रभारी राम सातपुते यांनी व्यक्त केली.

भाजपची अवस्था अशीच परिस्थिती राहिली तर भाजपची अवस्था आम आदमी पक्षासारखी होण्यास वेळ लागणार नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता असूनही पक्ष पत्त्याप्रमाणे ढासळला, याची जाणीव ठेवा, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रभारी राम सातपुते यांनी दिला.
नगरसेवक ‘प्लॉट’ पाडण्यात व्यस्त आहे. हा धागा पकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले काही नगरसेवक व्यवसायात व्यस्त आहेत काहीजण प्लॉट पाडायला गेले आहेत. काही जणांच्या हॉटेलवर धाडी पाडल्या आहेत, हॉटेल सील झाले आहेत, त्यामुळे ते कदाचित आले नसतील. परंतु हे चुकीचे आहे. नगरसेवक व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना पक्षामुळे पद मिळाले आहे, त्याचा सन्मान ठेवावा. पालकमंत्र्यांनी तर मला निरोप दिला आहे जे पक्षासाठी योगदान देतील त्यांनाच पुढील काळात पदाचा सन्मान मिळेल. सरपंच असो किंवा जिल्हा परिषद सदस्य त्याला पक्षासाठी वेळ देता येत नाही, त्याच्यासाठी पक्ष नेतृत्व वेळ देऊ शकणार नाही, अशीच ठाम भूमिका घेतली जाणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना राबवली. लाखो शेतकऱ्यांना फायदा दिला. मात्र राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पत्र जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सरकारी समित्या आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी सारख्या याद्या बदलल्या जात आहेत. नेत्यांच्या मागेपुढे केले जाते. गाडीत बसण्यासाठी गर्दी केली जाते. लवकर नियुक्तीच्या याद्या तयार झाल्या नाही तर बूथप्रमुखांना ही पदे दिली जातील, असा इशाराही प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विखे यांनी दिला.
भाजप पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची ठेकेदारी व सत्तेच्या माध्यमातून पदे घेऊन वरिष्ठाच्या मागे पुढे हुजरेगिरी करण्यात आघाडीवर असतात. या पदाधिकाऱ्यांना तर मंगळवार बुधवार मुंबई ला जाण्यास वेळ असतो पण पक्षाच्या हितासाठी व जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वेळ नाही. अशीही चर्चा काही निष्ठावंत कार्यकर्ता करत आहेत. पुढील निवडणुका लढवण्यासाठी तिकीट मिळेल या स्वार्थी हेतूने पक्षाची शाल सोईस्कर पणे खांद्यावर घेण्यात मात्र पटाईत आहेत. पदाधिकारी फक्त पद मिरवण्यासाठी असल्याची चर्चा उपस्थित कार्यकर्ते करत होते.

भाजप चे काही पदाधिकारी पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्या विरोधातच आंदोलन करून मंत्री महोदयांचे खात्यास बदनाम करताना काही दिवसांपूर्वी उत्तर नगर च्या पश्चिम भागात घडले. मुख्यमंत्री कृषी धोरणाच्या प्रकल्पविरोधातच काहींनी दंड थोपटल्याचे देखील काही दिवसांपूर्वी बघायला मिळाले यावरून देखील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनीच स्टंट करत ही योजनेला विरोध दाखवला होता. विशेष म्हणजे हे सर्व पदाधिकारी आयाराम होते, याची चर्चा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली तर विरोधकांनी यावर तिखट प्रतिक्रिया देखील दिली होती. अनेक पदाधिकारी चर्चेत राहण्यासाठी किंवा मीडियावर झळकण्यासाठी अनेक स्टंट करताना सध्या दिसत आहे. ठराविक लोकप्रतिनिधी व ठराविक नेत्याला खुश ठेवायचे पक्षाची भुमिका व शासनाच्या योजना यांना मात्र तिलांजली द्यायची असे प्रकार देखील सध्या निदर्शनास येत आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्याचे काम आहे. पण याच योजनेच्या विरोधात आंदोलन करून सरकारची योजनेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही पदाधिकारी करत आहेत..






