संपादकीय: सहदेव जाधव
सध्या महाराष्ट्रात भोंदूगिरी चे जसे काय पेव फुटले आहे. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी समजली जाते. येथे वारकरी परंपरा रुजवली गेली. साधू संतांचे विचार सांगितले जातात. प्रवचणे कीर्तने या माध्यमातून समाजाला योग्य सुसंस्कृत मार्ग सांगितला जातो. परंतू काही साधू संतांच्या विचारांचा अपभ्रन्स करून काही संधीसाधूनी वेगळीच प्रथा सुरु केली. भोंदूगिरीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि शारीरिक-लैंगिक शोषण करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा अधिनियम कायदा फक्त कागदावरच का..? असा प्रश्न पडत आहे.
काही दिवसांपूर्वी सिन्नर येथील अशोक खरात बाबा याचे बिंग फुटले त्याने अनेक महिलांचे शारीरिक शोषण केल्याचे तपासाअंती समोर आले. तसे अनेक व्हिडीओ देखील व्हायरलं झाले. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील वडगाव येथे राजेंद्र गडगे जो मंत्रोच्चाराने कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत होता. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या मोनाली विधाते हिने देखील अंगात देवी संचार करते म्हणत स्वतः ला गुरुमाता संबोधित असे. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत अशा भोंदूंवर गुन्हे दाखल करून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. मात्र तरीही पोलीस प्रशासनाची उदासीनता आणि काही भोंदूना मिळणारा राजश्रय यामुळे या भोंदूचे काळे धंद्याना पाठबळ मिळत आहे. भोंदू चे धाडस यामुळे वाढले आहे.

बिबवेवाडी येथील मोनाली विधाते ही भोंदू महिला हजारो लोकांना चुना लावून त्यांचा करोडो चा मलिदा लाटला आहे. या महिलेचे बिंग फोडले ते धाडसी पत्रकार पत्रकार मच्छिन्द्र टिंगरे यांनी. पत्रकार टिंगरे यांनी मोनाली विधाते ही एक गुन्हेगार महिला आहे. तिच्या अंगात कोणतीही देवी संचारत नाही ती वेश्या व्यवसाय चालवणारी गुन्हेगार असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच एका पिडीत मुलीला व तिच्या पुर्व पतीलाच समोर आणले व ते सिद्ध देखील केले. टिंगरे यांनी लावून धरलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. सामाजिक कार्यकर्त्या तसेच भुमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी देखील या भोंदू असलेल्या स्वयं घोषित गुरुमाता चे कारनामे उघड केले होते.
मोनाली विधाते नावाच्या महिलेवर कौटुंबिक अडचणी आणि शारीरिक व्याधी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी आता पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली आहे.प्रथमतः तिच्यावर दाखल गुन्ह्याबाबत माहिती घेऊया त्यानंतर सविस्तर चर्चा करूयात कौटुंबिक अडचणी दूर करण्यासह शारीरिक व्याधी कमी करण्याचे आश्वासन देत मृत्यूची भीती दाखवून पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप असलेल्या मोनाली आई विधाते हिच्यासह पाच जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

मोनाली विधाते, कृष्णा विधाते, मोनालीचा भाऊ मयुर, अशोक बनकर आणि मंजु कौर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील ४७ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. सुखसागरनगर येथील मोनाली विधाते हिच्या घरीही संबंधित व्यक्तीला बोलावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोनाली विधाते हिने फेसबुकवर ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ या नावाने खाते तयार केले होते. त्यावर कौटुंबिक अडचणी सोडविणे आणि देवी-देवतांशी संबंधित विविध व्हिडिओ प्रसारित करण्यात येत होते. त्यानंतर तक्रारदाराला शारीरिक व्याधी आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली हळदी-कुंकू, दोरा आणि बाहुली पाठवण्यात आली. पुढे त्यांना सुखसागरनगर येथील घरी बोलावून त्यांच्या अडचणींचे कारण सांगताना मृत्यूची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, मोनाली विधाते आणि अशोक बनकर यांनी भेटण्यासाठी ३ हजार १०० आणि ३०० रुपये घेतले. तसेच कथित जादूटोणा साहित्य आणि दोन वेळा उतारे करण्याच्या नावाखाली रोख २१ हजार रुपये आणि ऑनलाइन २१ हजार रुपये, अशी एकूण ४५ हजार ४०० रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत तसेच मृत्यूची भीती दाखवून पैसे घेण्यात आल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर मोनाली विधाते आणि इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या करत आहेत.
ही आहे गुन्ह्याबद्दल माहिती. आता आपण याचे सविस्तर विश्लेषण करूयात
मोनाली विधाते या स्वतः ला “गुरुमाता” म्हणून घेत आहे. असंख्य लोकांना तिने जादूटोना प्रक्रिया करायला लावली. यामाध्यमातून तिने अंगात देवी संचारने वगैरे प्रकार करून भोळ्या भाबड्या लोकांना फसविले असल्याचे समोर येत आहे. मोनाली विधाते हिचा व तिचा कथित पती कृष्णा विधाते यांनी मिळून अनेकांना गंडा घातल्याचे आरोप करण्यात येत होते. पत्रकार मच्छिन्द्र टिंगरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मोनाली विधाते हिचे अनेक कारनामे महाराष्ट्राला कळाले. आपल्या पतीला व लहान मुलांना सोडून ही महिला कृष्णा विधाते याच्यासोबत नवा संसार थाटून राहिली. विशेष म्हणजे ही व्याभाचारी महिला लोकांची आयडॉल होऊन बसली. त्यांनी सोशल मीडिया (विशेषतः इंस्टाग्राम रील्स) वर स्वतःचे किलोभर सोने घातलेले आणि कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावलेले व्हिडिओ शेअर करून ‘गुरुआई’ म्हणून ओळख निर्माण केली. कपाळावर कुंकू आणि अंगारा लावून लोकांचे गंभीर आजार आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचा दावा त्या करत असत.
मोनाली विधाते हिचा पुर्व इतिहास
मोनाली विधाते हिचा पुर्व इतिहास अतिशय धक्कादायक आहे. मसाज पार्लर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत या स्वयंघोषित गुरुमातावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा गुन्हा दाखल आहे. भूमाता ब्रिगेडच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि मच्छिन्द्र टिंगरे यांनी मोनाली विधाते यांच्या पूर्व इतिहासावर आणि त्यांच्या अचानक ‘गुरु’ बनण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणताही धार्मिक किंवा आध्यात्मिक वारसा नसताना अचानक त्या ‘गुरु’ म्हणून कशा नावारूपाला आल्या, याबाबत विरोधकांनी त्यांची ‘कुंडली’ (पूर्व इतिहास) समोर आणण्याची मागणी केली आहे. विविध प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरील चर्चांनुसार, त्या पूर्वी ‘मसाज पार्लर’ चालवत होत्या आणि त्यानंतर त्यांनी अचानक हा गुरूचा मार्ग स्वीकारला, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. तिच्यावर प्राण्यांशी संबंधित कायद्यांतर्गत (PETA) जुना गुन्हा आणि सेक्स रॅकेट चालवल्याचेही गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी व तक्रारदारांनी केले असून पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.
सेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप:
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, काही पत्रकार आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी तिच्या जुन्या पार्श्वभूमीवर बोट ठेवले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ती पूर्वी ‘सोनिया ठाकूर’ किंवा ‘मोनाली वावळ’ या नावांनीही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. २०१३ मध्ये पुण्याच्या आंबेगाव पठार भागात ‘मोनाली ऊर्फ सोनिया मच्छिंद्र वावळ’ नावाच्या महिला आरोपीला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने अटक केल्याची जुनी नोंद Times of India च्या बातमीत आढळते. सध्याच्या कथित ‘गुरुआई’ मोनाली विधातेचे हेच जुने कारनामे असल्याचा दावा सोशल मीडिया आणि मुलाखतींमधून केला जात आहे.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा अधिनियम कायद्याचे कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पण या कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस प्रशासन व आमदार, खासदार, मंत्री व सनदी अधिकारीच या भोंदूंच्या नादाला लागलेले आपण काही प्रकरणात पाहिले आहे. त्यामुळे यांच्यावर प्रतिबंध लावणारेच यांची शिकार बनलेले दिसत आहे. त्यामुळे या कायद्याची पाहिजे त्यापद्धतीने अंमलबजावणी होत नाही. भोंदू बाबांना या कठोर कायद्यान्वये कडक शासन करणे गरजेचे आहे म्हणजे या जादूटोना, करणी बाधा, अंगात देवी येणे,भुताने पच्छाडने, नरबळी, पशुबळी, मुलं होणे या अघोरीं कृत्यांना आळा बसेल. अन्यथा ‘बडाओ ढोल, और घुमो गोल-गोल’

क्रमश: पुढील भोंदू शेवगाव तालुक्यातील लवकरच






