श्रद्धांजली विशेष लेख: सहदेव जाधव
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या राजकारणात एक आक्रमक, डॅशिंग आणि सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या नेत्या म्हणून आशाताई बुचके यांची ओळख. आज त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. त्या 58 वर्षांच्या होत्या. प्रथमत: त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा राजकीय प्रवास तसा अत्यंत संघर्षाचा आणि चढ-उतारांचा राहिला आहे. आपण या माध्यमातून त्यांच्या राजकीय जीवनावर एक प्रकाशझोत टाकून त्यांना शब्द सुमनांची श्रद्धांजली अर्पित करूया
सुरुवातीचा काळ आणि शिवसेनेतील १५ वर्षे (२००६ – २०२१)राजकीय सुरुवात:
आशाताई बुचके जुन्नर सारख्या ग्रामीण भागातून एक महिला नेतृत्व म्हणून उदयास आल्या. पुरुषप्रधान संस्कृती ला झुगारून महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य कशी हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिले. आशाताई या पूर्वाश्रमीच्या मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या, परंतु पुढे त्यांनी जुन्नर तालुक्यात येऊन शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सक्रिय ग्रामीण राजकारणाची सुरुवात केली.
जिल्हा परिषद कार्यकाळ:
त्यांनी सलग १५ वर्षे शिवसेनेमध्ये राहून काम केले. जुन्नर तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेवर (ZP) त्या निवडून गेल्या. आणि तेथे त्यांनी शिवसेनेचे गटनेतेपद देखील भूषवले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन आणि ग्रामीण भागातील विकासकामांवर मजबूत पकड निर्माण केली. पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्षात त्यांचा दबदबा होता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मोठा पगडा त्यांच्यावर होता. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ते दैवत मानत होते.

विधानसभेचा संघर्ष:
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जुन्नर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ही निवडणूक जरी आशा ताई पराभूत झाल्या पण त्यांची ही लढाई महाराष्ट्रात चर्चीली गेली. या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वल्लभ बेनके यांच्याकडून त्यांचा अवघ्या ६,४५८ मतांनी पराभव झाला. पराभवानंतरही त्यांनी जुन्नरमधील आपला जनसंपर्क कमी होऊ दिला नाही.
शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याने शिवसेना सोडली:
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात जुन्नरमधील शिवसेनेच्या अंतर्गत समीकरणात मोठे बदल झाले. २०१९ मध्ये जुन्नरचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आशाताईंच्या राजकीय भूमिकेबाबत पक्षात मतभेद निर्माण झाले. परिणामी, पक्षांतर्गत वाद वाढल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या समर्थकांनीही राजीनामे दिले. या काळात “मला परक्यांनी नाही तर स्वकीयांनीच पराजित केले,” अशी उद्विग्न भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये आशाताई बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करत कमळ हाती घेतले. मुंबईत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. भाजपने त्यांच्यावर जुन्नर विधानसभा प्रमुख आणि राज्य परिषद सदस्य अशी महत्त्वाची जबाबदारी सोपवली.

महायुतीमधील संघर्ष आणि आक्रमक पवित्रा
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत सामील झाल्यानंतर जुन्नरच्या जागेवरून स्थानिक पातळीवर वाद उफाळला. जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनके आमदार असल्याने ही जागा राष्ट्रवादीला जाण्याचे संकेत होते. ऑगस्ट २०२४ मध्ये अजित पवार यांच्या ‘जनसन्मान यात्रे’दरम्यान आशाताई बुचके यांनी महायुतीत असूनही थेट अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवला, ज्यामुळे त्या राज्यभर चर्चेत आल्या होत्या. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जुन्नरची जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सुटल्यामुळे आशाताई बुचके यांनी भाजपविरोधात बंडखोरी केली. “मी माझ्या जनतेसाठी लढणारच” अशी भूमिका घेत त्यांनी जुन्नर मतदारसंघातून अपक्ष म्हणून ‘प्रेशर कुकर’ या चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तगडे आव्हान दिले होते. या तिरंगी लढतीत शरद सोनवणे यांचा विजय झाला तर अतुल बेनके व आशा ताई बुचके यांचा पराभव झाला.
सध्या आशाताई बुचके या उत्तर पुणे जिल्हा आणि जुन्नर भागात भाजपच्या प्रमुख नेत्या म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी सावरगाव-कुसूर गटातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.आशाताई बुचके यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणूनच नाही तर जुन्नर तालुक्यातील महिला भगिनींचे प्रश्न, माथाडी कामगारांचे प्रश्न आणि स्थानिक शेतकरी-सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून भांडणाऱ्या एक ‘रणरागिणी’ अशी आहे.
आज त्यांचा हा संघर्षमय प्रवास थांबला आहे. त्यांचे हे कार्य पुणेकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील हे राजकीय क्षेत्रातील वादळ कायमचे शांत झाले आहे. अशा या संघर्षषाली रणरागिणीला अखेरचा दंडवत..!







