महिला आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघांतही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
संपादकीय: सहदेव जाधव
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. कर्जत, अकोले आणि पारनेर सेवा संस्था मतदारसंघांतील लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघांतही अटीतटीची लढत अपेक्षित आहे. या निवडणुकीत एकूण ३ हजार ८३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदारांना सहलीवर नेण्याची रणनीती;
थेट मतदानाच्या दिवशीच परतणार!निवडणुकीतील चुरशीच्या मतदारसंघांमध्ये मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत. विशेष म्हणजे, विजयासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असल्याने काही उमेदवारांनी आपल्या समर्थक मतदारांना सहलीवर नेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत हे मतदार एकत्र ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित मतदार थेट मतदानाच्या दिवशीच मतदारसंघात परतणार असल्याचे चित्र आहे.
मतदार फुटू नयेत, विरोधकांच्या संपर्कात जाऊ नयेत आणि मतदानाच्या वेळी आपल्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावेत, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. सहलीचे नियोजन, मतदारांची ने-आण आणि मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था याकडेही उमेदवारांच्या समर्थकांचे लक्ष असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची राहिली नसून मतदारांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याचीही कसोटी ठरत आहे.

विखे-थोरात प्रथमच एकत्र
यंदाच्या निवडणुकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्या पॅनलविरोधात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार, तसेच खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील गट निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिनविरोध झालेल्या ११ जागांपैकी १० जागा विखे-थोरात गटाने, तर एक जागा राम शिंदे गटाने मिळवली आहे. विखे-थोरात युतीमध्ये थोरात गटाचे सहा, तर विखे गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे बँकेवर विखे-थोरात युतीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. आता उर्वरित १० जागांसाठी २७ उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
कर्जतमध्ये विखे विरुद्ध राम शिंदे
कर्जत मतदारसंघात सभापती राम शिंदे समर्थक ज्योती प्रकाश शिंदे आणि विखे समर्थक अंबादास पिसाळ यांचे पुत्र तुषार पिसाळ यांच्यात सामना रंगणार आहे. विखे-थोरात युतीने राम शिंदे समर्थकांविरोधात अधिकृत पॅनलचा उमेदवार देणे टाळले असले, तरी तुषार पिसाळ हे विखे समर्थक असल्याने ही लढत अप्रत्यक्षपणे विखे विरुद्ध राम शिंदे अशीच होण्याची चिन्हे आहेत.

अकोल्यात लहामटे-शिंदे सामना
अकोले मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात माजी आमदार वैभव पिचड आणि अमित भांगरे यांच्या समर्थकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सलग दहा वर्षे संचालकपदावर राहिल्याने सीताराम गायकर यांना स्वतः निवडणूक लढविण्यावर बंधन आल्याने त्यांनी कन्येच्या माध्यमातून उमेदवारी दिली आहे.
पारनेरमध्ये लंके-विखे प्रतिष्ठेची लढत
पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात विखे समर्थक राहुल शिंदे मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत लंके विरुद्ध विखे अशीच रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
महिला आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातही चुरस
महिला मतदारसंघात हर्षदा काकडे, अनुराधा नागवडे आणि संगीता वाघ यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात माजी आमदार वैभव पिचड आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रसाद लोखंडे यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. एकूणच, बिनविरोध जागांमुळे विखे-थोरात युतीने आघाडी घेतली असली, तरी उर्वरित जागांवरील लढतीत स्थानिक राजकीय समीकरणे, मतदारांची भूमिका आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांना सहलीवर नेण्याच्या चर्चेमुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली असून, २ नोव्हेंबरच्या मतदानानंतर जिल्हा बँकेच्या सत्तेचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.







